विक्रमी रक्त संकलनासाठी राज्य शासनाकडून चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचा सत्कार
अनिल ठाकरे | चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने वर्धापनदिनानिमित्त कोविड रुग्णांसाठी मदतीचा हात म्हणून १६ जानेवारी २०२१ रोजी घेतलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल एक हजार पेक्षा जास्त रक्तपिशव्या संकलित करून उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई येथे जागतिक रक्तदातादिनी पार पडलेल्या समारंभात सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या हस्ते औष्णिक केंद्राचा सत्कार करण्यात आला.
कोविड काळात सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या वतीने ३७ व ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात कर्मचारी, अधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात रक्तदान करून सुमारे १००० पेक्षा जास्त रक्तपिशव्या संकलित केल्या होत्या.
या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन जागतिक रक्तदाता दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या एका समारंभात सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते महाऔष्णिक केंद्राचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक राजेश मोराळे, मुख्य अभियंता पंकज सपाटे, कार्यकारी अभियंता (प्रशिक्षण) राजकुमार गिमेकर यांनी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारले आहे.
२९२० मे.वॅ. स्थापित क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे वीज निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली जाते. कोरोना काळातही केंद्रातील महानिर्मितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांनी अविरतपणे सेवा बजावून वीजपुरवठा अखंडीत ठेवला होता. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने महाऔष्णिक केंद्राने रक्तदान शिबिर घेतले होते.