सारथी संस्थेला पुण्यात शिवाजीनगरमध्ये मिळणार जागा, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संस्थेसंदर्भात राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संस्थेला पुण्यात शिवाजीनगर येथील जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शिवाजी नगरमधील शालेय शिक्षण विभागाची 4 हजार 163 चौ.मी जागा सारथी संस्थेला देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या जागेसंदर्भातील प्रलंबित प्रश्न निकाली निघाला आहे. या ठिकाणी सारथीचे कार्यालय, अभ्यागत कक्ष, अभ्यास केंद्र, ग्रंथालय, अभ्यासिका, कॉन्फरन्स हॉल आदी सोयीसुविधा असतील.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हे ध्यानी घेता मराठा समाजातील तरुणांना शिक्षण क्षेत्रात दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाकडून सारथी संस्था स्थापन करण्यात आली. आता या संस्थेला शासकीय जागावाटपाबाबतच्या नियमित अटी व शर्तींनुसार महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित किमतीने जागा देण्यात येणार आहे.