एसटी चालकाचं सुसाईड; न्यायासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
उमाकांत अहीरराव | अनियमित पगार आणि कर्जबाजारीपणामुळे शुक्रवारी कमलेश बेडसे (वय ४५) या एसटी चालकानं नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री इथं घडली होती. या घटनेनंतर आगारातील इतर कर्मचारी आक्रमक होत, रस्त्यावरचं बस सोडून आंदोलनाला बसले होते. दरम्यान महामंडळाकडून आश्वासन देऊनही कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याने आत्महत्या करणाऱ्या कमलेश बेडसे यांच्या नातेवाईकांसह 15 ते 20 जणांच्या विरोधात साक्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
मयत कमलेश बेडसे यांच्या वारसांना 50 लाख रुपये द्यावेत, या मागणीसाठी त्यांचे नातेवाईक सुधीर अकलाडे, संजय अहिरराव, मोहन गोकुळ सुर्यवंशी, वेडू सोनवणे, सुरेश शेवाळे, अनिल अहिरे, महेंद्र देसले, धीरज प्रकाश देसले, कल्याण गुलाबराव भोसले, फिरोज हिदायत शेख पठाण, धनंजय अहिरराव, धनराज चौधरीसह इतर पंधरा ते वीस जणांनी सायंकाळी सहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर येवून रास्तारोको आंदोलन केले.
दरम्यान महामंडळाकडून आश्वासन देऊनही आंदोलन करण्याची गरज काय, असे सांगत पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक मागणीवर ठाम होते. रात्री आठ वाजेपर्यंत आंदोलनामुळे दोन्ही बाजुकडील वाहतूक ठप्प झाली होती. अखेरीस पोलिसांनी बळाचा वापर करुन सर्व आंदोलकांना तेथून हटविले व सर्वांविरुद्ध जमावबंदी कायद्याचे उल्लंघन तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस संजय शिरसाठ यांनी फिर्याद दिली आहे.