10वी, 12वीचा निकाल कधी? वर्षा गायकवाड म्हणाल्या...
मुंबई : राज्यातील दहावी-बारावीच्या (SSC-HSC Result) विद्यार्थी-पालकांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. याच संदर्भात आज मोठी माहिती समोर आली आहे. बारावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार तर दहावीचा त्यानंतर 15 दिवसांनी लागणार असल्याची माहिती संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.
यंदाच्या दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात थोडा संभ्रम निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या सुमारे 30 हजार सदस्यांनी म्हणजेच विनाअनुदानीत शिक्षकांनी यंदा उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास स्पष्ट नकार दिला. शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. परंतु, आता वर्षा गायकवाड यांनी निकालासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
यानुसार बारावीचा निकाल पुढील आठवड्यात 6 किंवा 7 तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजेच 23 किंवा 24 तारखेला लागणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय, टीईटी (TET) परीक्षा कोणाला घ्यायला सांगायचे हे तीन कंपन्यांमध्ये ठरवले जाईल, असे विधान वर्षा गायकवाड यांनी केले आहे.