Kirit Somaiya : संजय राऊतांनी माफी मागावी; सोमय्यांच्या पत्नीने गाठले न्यायालय
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी मुंबई उच्च न्यायालयात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर १०० कोटींचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊतांना माफी मागावीच लागेल, असेदेखील वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे.
संजय राऊत यांच्या वक्तव्याने प्रतिमा डागळली असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. राऊतांच्या वक्तव्याविरोधात किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी न्यायालय गाठत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. तर राऊत यांच्यावर न्यायालयाने कारवाई करेल व त्यांना दंड ठोठवल्यास या दंडाची रक्कम धर्मादाय संस्थेला देणार असल्याचेही सोमय्यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी माफी कशी मागावी याची तयारी सुरू करावी, असेही किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे. राज्यात सध्या माफियाराज सुरु आहे. या माफियाराजला धडा शिकवण्यासाठीच १०० कोटींची अवमान याचिका मेधा सोमय्या यांनी दाखल केली आहे. यावरील सुनावणी जून महिन्यात होणार आहे, अशी माहितीही सोमय्यांनी दिली.
दरम्यान, मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यानंतर किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांनी माफी मागावी. अन्यथा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.