Smart Village Of Navi Mumbai : सायबर सिटीतील पहिले स्मार्ट व्हिलेज 'दिवाळे'
हर्षल भदाणे पाटील | पनवेल : गाव दत्तक योजनेअंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव (Diwale Village To Become Smart Village) हे दत्तक घेतले आहे. त्यानुसार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्याकडून बेलापूर विभागातील दिवाळे गाव स्मार्ट व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात गावात विविध सुविधांची निर्मिती केली आहे. या संपूर्ण पायाभूत सुविधांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर आता म्हात्रे यांनी स्मार्ट दिवाळे गावाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यातील विकास कामांचे आणि सविस्तर माहितीचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासमोर सादरीकरण केले. या संकल्पनेचे आयुक्तांनी कौतुक केले आहे.
स्मार्ट व्हिलेज दिवाळेअंतर्गत समाजोपयोगी बहुउद्देशीय इमारत, सुसज्ज भाजी मार्केट, अत्याधुनिक लायब्ररी, व्यायाम शाळा इमारत, बँड पथकाकरिता प्रशिक्षण केंद्र, लहान मुलांकरिता खेळणी घर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, संगणक प्रशिक्षण केंद्र, सोलर सिस्टम उभारणे, खेळाचे मैदान, मध्यवर्ती मार्ग, समुद्रकिनारी फिरण्यासाठी रस्ता, जॉगिंग ट्रक, भव्य उद्यान, संपूर्ण गावाच्या सभोवताली रिंग रोड, लग्न कार्यासाठी स्टेज, प्रसाधनगृहे आदी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व पायाभूत सुविधांचे मंदा म्हात्रे यांनी बुधवारी आयुक्त बांगर यांच्यासमोर सादरीकरण केले.
दिवाळे गाव हा पायलट प्रोजेक्ट असून, हे गाव पूर्णतः विकास होताच बेलापूर मतदारसंघातील इतर गावेही दत्तक घेऊन त्यांचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्याची योजना असल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले.