श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण आजही उपयोगी पडते- भगत सिंह कोश्यारी
सचिन चपळगावकर | श्री संत ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी होऊन गेले असे वाटतच नाही..! त्यांची शिकवण आज ही उपयोगी पडत असल्याचे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी ते बोलत होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, बाळासाहेब चोपदार, बाळासाहेब अरफळकर, योगी निरंजन नाथ, उमेश बागडे आदी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार शाश्वत असून समाजाला या विचारांची आज आवश्यकता आहे. मानवकल्याणसाठी या विचारांचा संपूर्ण विश्वात प्रसार व्हावा , असे त्यांनी सांगितले.दर्शनासाठी आलेल्या कोशारी यांनी या वेळी मंदिरात सुरू असलेल्या कीर्तनात सहभागी होऊन टाळ वाजवण्याचा आनंद ही लुटला..! आळंदी मध्ये कार्तिकी संजीवन समाधी सोहळा सुरू आहे..! येत्या 2 तारखेला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे.