Petrol-Diesel| राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलची टंचाई; कृत्रिम की...
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात फटका बसत होता. यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अशातच राज्यात अचानक अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई (Petrol-Diesel Shortage) निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, ही टंचाई कृत्रिम तर नाही ना, अशाही शंका उपस्थित करण्यात येत आहे.
पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु, यानंतर राज्यात एका वेगळ्याच समस्येने डोके वर काढले आहे. राज्यात अनेक ठिकाणी अचानक पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. अमरावती, हिंगोली, सेनगाव, जुन्नरमधील नारायणगाव आदी ठिकाणी पेट्रोल-डिझेल संपल्याचे बोर्डच झळकले आहेत. यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. पुरवठादारांकडूनच पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याने पेट्रोल-डिझेलची टंचाई झाल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात येत आहे.
पेट्रोल-डिझेलची टंचाई कृत्रिम असल्याची चर्चा
माहितीनुसार, केंद्र-राज्य सरकारने इंधनाच्या शुल्कात कपात केल्याने पेट्रोल-डिझेलच्या पुरवठादारांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पुरवठादारांकडून कच्च्या तेलाच्या वाढत्या दरानुसार कमिशन देण्याची मागणी कंपन्यांकडे करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई कृत्रिम असल्याची चर्चा केली जात आहे.
केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. यापाठोपाठ राज्य सरकारनेही दर कमी करण्याची घोषणा केली. यानुसार पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्ये अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रतिलीटर कपात केल्याचे सांगितले. यामुळे पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.