पीएफआयबाबत धक्कादायक माहिती; राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा डाव
मुंबई : देशात सध्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)अर्थात पीएफआय कार्यालयांवर धाडी टाकत एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यानंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर केले असता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा मॉड्युल या पीएफआय संघटनेचा असल्याची माहिती देण्यात आली.
पुणे, नांदेड, औरंगाबादसह नाशिकमध्ये छापे टाकून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांना एटीएसने ताब्यात घेतले होते. यानंतर या कार्यकर्त्यांना नाशिक न्यायालयात हजर केले. यावेळी पीएफआय संघटनेच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महत्वाचे म्हणजे २०४७ पर्यंत भारत देश मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव पीएफआयने आखला होता. यासाठी राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचे मॉड्युल या संघटनेचे होता.
यासाठी पीएफआयचे संशयित आरोपी परदेशात देखील जाऊन आले आहेत. त्यांच्या खात्यावर परदेशी रक्कमही जमा झालेली आहे. याशिवाय देशभरातील पीएफआय कार्यकर्त्यांचा एक व्हॉटस् अॅप ग्रुपदेखील बनविण्यात आला आहे. याचा अॅडमिन पाकिस्तानातील असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी माहिती दिली.
दरम्यान, पीएफआय संघटनेवर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यापुर्वीच करण्यात आली आहे. या संघटनेचे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेशी संबंध असल्याची माहितीदेखील मिळाली होती. तसेच ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असं केंद्राने म्हटलं आहे. या दोन्ही बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आहे.