‘अदानीं’च्या नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड
मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकावरून शिवसैनिक चांगेलच आक्रमक झाले होते. शिवसेनेने या नामफलकाला विरोध करत तोडफोड करून तो हटवला. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे.
मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती.
मुंबई विमानतळाचा जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावले होते. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे कार्यकर्त्यानी कडाडून विरोध करत नामफलकाची तोडफोड केली आहे. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असून अदानीने आपलं नाव देऊ नये अशी शिवसेनेची मागणी आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणलं जात आहे. सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे.