Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावर शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस, कोणाला मिळणार संधी?
राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार (Eknath Shinde) स्थापन झाले. सध्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वाधिक आमदार असल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्याकडे गेले होते. त्यानंतर आता विधानपरिषदेतील (Maharashtra Legislative Council) विरोधीपक्षनेता कोण कोणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे.
राज्याच्या विधानपरिषदेत एकूण ७८ आमदार आहेत. मविआत शिवसेनेचे विधानपरिषदेत सर्वाधिक १३ आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेतील आमदारांच्या संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क असल्याची भूमिका शिवसेना नेते सचिन अहिर यांनी मांडली आहे. आमच्याकडे एकनाथ खडसे यांच्यासारखे सरकारला धारेवर धरू शकणारे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपदही आम्हालाच मिळावे, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. त्यामुळे या पदावरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.
शिवसेनेकडून लवकरच विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र पाठवून या पदावर दावा सांगितला जाणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे यामध्ये शिवसेनेचे १३ सदस्य आहेत. "आमचे सदस्य जास्त असल्याने विरोधी पक्षनेते पद आम्हाला द्या," अशी मागणी शिवसेनेने केली आहे.