इंधन दरवाढीवरून शिवसेना आक्रमक; राज्यभर तीव्र आंदोलन
लोकशाही न्यूज नेटवर्क
देशातील जनता महागाई त्रस्त असताना त्यांना दिलासा देण्याचे सोडून केंद्र सरकारच्या अखत्यारित्या तेल कंपन्यांकडून पेट्रोल – डिझेलच्या दरात भरमसाट वाढ केली जात आहे. हे कमी म्हणून की काय घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात दोन महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने आज राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे.
कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती ९३ रुपयांवर तर डिझेल दरवाढ ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटीविरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून, शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गर्शनाखाली विभाग प्रमुख, मुख्य प्रतोद, आमदार सुनिल प्रभु, आमदार रवींद्र वायकर व विधानसभा संघटक नगरसेविका साधना माने यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारचा गैरकारभार, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा जनतेवर भार!, रद्द करा, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा….,सारी जनता एक हो, एक होके केंद्र सरकार को फेक दो… मोदी सरकार मुर्दा बाद…. केंद्र सरकार हाय हाय… अशा जोरदार घोषणांनी गोरेगाव रेल्वे स्थानक परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला आहे.\
जिल्ह्याजिल्ह्यात निदर्शने
इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी केंद्र सरकारविरोधात शिवसेनेच्या वतीने जिल्ह्याजिल्ह्यात निदर्शने करण्यात येणार आहेत. बैलगाड्या, सायकल मार्च काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल – डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध केला जाईल. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये तसेच शासकीय कार्यालयांसमोर प्रामुख्याने ही निदर्शने केली जाणार आहेत.