Nawab Malik Arrested : शरद पवारांच्या उपस्थितीत ‘सिल्व्हर ओक’वर बैठक, मलिकांबाबत कोणता निर्णय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांच्या अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे देखील शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.
नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर ते नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी नवाब मलिक यांच्या ताब्यातील खातं कोणत्या मंत्र्याकडे देण्यात यावं याबाबत सिल्व्हर ओकवरील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मलिक यांच्याकडे खात्याचा अतिरिक्त पदभार मंत्री हसन मुश्रिफ, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील किंवा अन्य कोणत्या नेत्याकडे दिला जावा यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.