रायगडात शाळांची घंटा वाजणार नाही, कारण…
राज्यातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा 15 जुलैपासून सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. असे असले तरी रायगड जिल्हयातील शाळा सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. शासनाने घालून दिलेले नियम आणि जिल्हयातील कोरोना रूग्णसंख्या पाहता एकही शाळा सुरू होईल अशी स्थिती दिसत नाही.
शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवण्यात आला आहे. मात्र कुणीही धोका पत्करायला तयार नाही. जिल्हयात 8 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या 302 शाळा आहेत. या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत पालकही सकारात्मक आहेत. परंतु अद्याप एकाही समितीने शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव शिक्षण विभागाकडे पाठवलेला नाही. ज्या गावात शाळा सुरू करायच्या आहेत तेथे मागील महिनाभरात कोरोनाचा एकही रूग्ण नको अशी शासनाची प्रमुख अट आहे. ग्रामीण भागात एका शाळेत अनेक गावांतील विद्यार्थी येत असतात. जिल्हयात सध्या कोरोनाचे साडेचार हजार रूग्ण अॅक्टीव्ह आहेत.