मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांचा मुद्द्यावरून राज्यात आंदोलन सुरु केलं आहे. एकीकडे मनसेकडून राज्य सरकारवर टीका केली जात असताना दुसरीकडे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या भूमिकेवर सडकून टीका केली जात आहे. या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
“ज्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची ही व्यंगचित्रांची कला होती असे आम्हाला वाटायचे त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरु केले आहे.” असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. तसेच भोंग्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी राज ठाकरेंसह भाजपवर देखील निशाणा साधला आहे. जागतिक व्यंगचित्रकला दिनाच्या निमित्ताने आज संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.
“बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार या देशात निर्माण व्हावा. या देशात सध्या जे एकाधीशाही सुरु आहे, त्याविरोधात बेधडकपणे आसूड ओढावे अशी आम्ही नेहमी देवाकडे प्रार्थना करतो. ज्यांच्यामध्ये ही क्षमता होती असे आम्हाला वाटायचे त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरु केले आहे.” अशा खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे.
“पण दुर्दैवाने भाजपने त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटला”
“बाळासाहेब ठाकरे हे आधी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. बाळासाहेब ठाकरेंनी आधी व्यंगचित्राच्या माध्य़मातून फटकारे मारले. त्यांना कोणत्याही भाडोत्री भोंग्यांची गरज लागली नाही. बाळासाहेबांची व्यंगचित्रकला पुढे जाईल असे आम्हाला वाटले होते पण दुर्दैवाने भाजपने त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटला आहे. यामुळे महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहे.” असा आरोप देखील त्यांनी भाजपवर केला आहे.
“बाळासाहेबांच्या फटकाराने कोणालाही सोडलं नाही. कुंचला आणि वाणी या दोन अमोग शस्त्रांनी बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात नाही तर देशात सत्ता परिवर्तन केले, हीच कुंचलाची ताकद आहे. त्यामुळे आजही आम्ही व्यंगचित्र्यांच्या कुंचल्यापुढे कायम नतमस्तक होतो.” असेही राऊत यांनी म्हटले.