'द ग्रेट नवनीत राणा' म्हणत गंभीर आरोप; संजय राऊतांनी काही वेळातच 'ते' ट्विट केलं डीलीट
शिवसेना आणि नवनीत राणा यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पुन्हा एकदा नवनीत राणांवर गंभीर आरोप केला आहे. सीबीआयने छापा मारलेल्या कंपनीकडून 1.50 कोटी कर्ज घेतल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता. या गंभीर आरोपानंतर लगेचच राऊत यांनी हे ट्विट डीलीट केले आहे.
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नवनीत राणा वर ट्विट करून गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले, कीर्ती केडिया यांच्या मालकीच्या ट्रान्सकॉन देव या कंपनीवर 20 बँकांची 4000 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने छापा टाकला होता. याच मीडिया कंपनीकडून 'द ग्रेट नवनीत राणा' यांनी 1.50 कोटी कर्ज घेतल्याचा आरोप केला आहे. नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात तशी माहिती दिली असल्याचे त्यांनी म्हटलेय.
दरम्यान हे ट्विट केल्याचे काही तासातच त्यांनी हे ट्विट डीलीट केले आहे. त्यामुळे आता या आरोपामुळे नवनीत राणा अडचणीत येणार की ट्विट डीलीट केल्यामुळे संजय राऊत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी संजय राऊतांनी केलेल्या ट्विटवर सवाल उपस्थित केला आहे. केशव उपाध्याय यांनी राऊतांचे ट्विटचा फोटो पोस्ट करत ते ट्विट डीलीट का केला असा सवाल उपस्थित केला आहे.