शिवसेना युपीएचा भाग बनणार का?, संजय राऊतांनी सांगितले…
आता यूपीए नाही या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेससह अन्य पक्षांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती आणि काँग्रेस नेतृत्वावर टीका करत आता यूपीए नाही असे म्हटले होते. त्यावर नवा वाद सुरु झाला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
"शिवसेना युपीएचा भाग बनणार का? यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. आम्ही कोणाचा भाग व्हायचं, किंवा कोणाचाही भाग झाल्याशिवाय आम्ही तीन पक्ष महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून राज्यात सत्तेत आहोत. युपीए म्हणजे, काय असतं नक्की? भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येतात. सत्ता स्थापन करतात. एनडीएही याच पद्धतीनं चाललं. वाजपेयींच्या नेतृत्त्वाच एनडीएमध्येही अनेक विचारधारांचे पक्ष होते. त्यामध्ये राम मंदिराला विरोधक करणारेही पक्ष होते.
महाविकास आघाडीतही असेच भिन्न विचाराचे तीन पक्ष आहेत. महाराष्ट्रात प्रयोग सुरु आहे, तो मिनी युपीएचाच प्रयोग आहे", असं राऊत म्हणाले. "युपीए किंवा विरोधी पक्षांची आघाडी आहे, त्यांनी अधिक मजबुतीनं पुढे यावं. त्यात जास्तीत-जास्त पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. आणि पर्याय उभा केला पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांसोबतच शरद पवारांचीही भूमिका आहे.", असंही राऊतांनी स्पष्ट केलं.
"राहुल गांधी यांना भेटणार आहे, यांना तुम्ही सौजन्य भेट का म्हणत नाही? महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झालेला पक्ष आहे. समान मुद्द्यावर आम्ही सरकार चालवत आहोत. सरकार उत्तम चाललेले आहे. तिन्ही पक्षामध्ये संवाद असावा आम्हाला वाटते म्हणून दिल्लीत असताना चर्चा करतो. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर, देशातील घडामोडींवर चर्चा करतो. पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. आम्ही गोव्यात निवडणूक लढवत आहोत. उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्यासाठी आम्ही चाचपणी करत आहोत. अशावेळी काँग्रेस गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणुका लढवत आहेत," असे संजय राऊत म्हणाले.
"शिवसेना गोव्यात स्वतंत्र्य जागा लढण्यास चाचपणी करत आहे. गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तृणमूलने आघाडी स्थापन केली आहे. शिवसेनेला त्या आघाडीत जायचे नाही. गोव्याच्या जनतेची मानसिकता आम्हाला माहिती आहे. गोव्यात काय होईल हे तृणमूलपेक्षा शिवसेनेला जास्त माहिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्याचे नाते आहे. आदित्य ठाकरे गोव्यावर लक्ष ठेवून आहे," असे संजय राऊत म्हणाले.