मविआची एकजूट निकालानंतर कळेल - संजय राऊत
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मविआची एकजूट संध्याकाळी निकालानंतर कळेलची भूमिका त्यांनी मांडली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र आहेत असे म्हटले आहे.
“विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र आहेत. ही एकजूट संध्याकाळी आठच्या दरम्यान कळून येईल. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हातात हात घालून चाललेले आहेत. धोका वगैरे शब्द यावेळी वापरणे योग्य नाही. आम्हाला धोका असेल तर समोरच्यांना नाही का? धोका एकतर्फी असतो का?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
“नाना पटोलेंनी जे सांगितले त्यामध्ये तथ्य आहे. आमदार पक्षासोबत असतानाही त्यांना सातत्याने धमक्यांचे निरोप येत होते. पण त्याचा काही परिणाम होणार नाही कारण लोकशाही आहे. लोकशाहीला काही मालक निर्माण झाले असले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही या सर्वावर मात करु. आजची निवडणूक ही महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील,” असे संजय राऊत म्हणाले.