Sanjay Raut : "महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे, त्यामुळे स्टंटबाजी बंद करा"
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) धमकीचं पत्र आलं असून त्यांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटवून देऊ, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला होता. त्यावरच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. त्यामुळे स्टंटबाजी बंद करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना सुनावले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तुम्ही इतकी वर्षे महाराष्ट्रात राहताय, तुम्ही ठाकरे आहात, तुम्हाला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये आहे का? राज ठाकरे यांच्या केसालाही महाराष्ट्रात धक्का लागणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.
तसेच कोणीही कोणाला हात लावत नाही. शिवसेना भवनात अशी पत्रं शेकड्याने येत असतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. लागणार असेल तर केंद्र सरकार CISF च्या जवानांची सुरक्षा द्यायला समर्थ आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. तुम्ही इतकी वर्षे महाराष्ट्रात राहत आहात, ठाकरे आहात. तुम्हाला हात लावण्याची हिंमत कोणीही करणार नाही. किंबहुना महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला हात लावण्याची हिंमत कोणीही करणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. त्यामुळे स्टंटबाजी बंद करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना सुनावले.
'राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल'
राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल. बाळा नांदगावकरला धमकी आली, ते ठीक आहे. पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी, अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी केली होती.