संजय राठोडांचा राजीनामा मंजूर
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे.त्यामुळे राठोड यांची गच्छंती झाली आहे.
गेल्याच आठवड्यात संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने भाजपकडून टीका करण्यात येत होती. अखेर आज या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला होता.
तात्काळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर सही करून तो मंजूर केला आहे.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
"संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याची माहिती राजभवनातून देण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेचा संताप पाहता, मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांकडे राजीनामा पाठवून दिला आहे. आता पुढील कार्यवाही सुरू ठेवावी." असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.