१९९३ चा तपास भोवला… पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा दावा!

१९९३ चा तपास भोवला… पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा दावा!

Published by :
Published on

वाझे प्रकरणात सारवासारव करताना राज्य सरकारने पोलीस प्रशासनात काही बदल केले आहेत. मात्र, पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची वेळ ओढावलेल्या ठाकरे सरकारसमोर आणखी एक अडचण उभी राहिली आहे. या बदल्यांमुळे पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी नाराज झाले आहेत. यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) माजी प्रमुख संजय पांडे यांचा समावेश आहे.

या बदल्यांनंतर आयपीएस संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये त्यांनी खात्यांतर्गत झालेल्या घुसमटीवर वक्तव्य केले आहे. १९९३ साली झोन -८ ला पोलीस उपायुक्तपदी असताना मी शिवसेनेविरोधात खेरवाडी परिसरात तपास हाती घेतला होता. पण सरकार म्हणून माझ्यासोबतचा हा पूर्वग्रह दूर करणार नसेल, तर आपण सुरक्षित हातात नाही, असं वक्तव्य आयपीएस संजय पांडे यांनी केले आहे.

केवळ या नाही, तर आधीच्या सरकारने देखील माझ्यावर अन्याय केल्याचे वक्तव्य महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केलं आहे. नव्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या करताना ज्येष्ठता डावलल्याचा खेद त्यांनी बोलून दाखवला. तसेच विद्यमान सरकारचे निर्णय हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नसल्याचा त्यांनी दावा केला.

याआधी संजय पांडे यांनी होम गार्डचे महासंचालक तसेच महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. नुकतेच सचिन वाझे प्रकरणात उचलबांगडी झाल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची राज्याच्या होम गार्ड महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. परमबीर सिंग यांच्याकडे यापुढे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आज या विभागाचा पदभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, ते आज होमगार्डच्या मुख्यालयात जाणार नसल्याची माहिती समोर आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com