मिरज दंगल प्रकरणात सरकारकडून खटला मागे; 106 जणांची निर्दोष मुक्तता

मिरज दंगल प्रकरणात सरकारकडून खटला मागे; 106 जणांची निर्दोष मुक्तता

Published by :
Published on

संजय देसाई, सांगली – मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगली घडली होती.ज्या नंतर या दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीत उमटले होते. सध्याच्या आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आल्याने न्यायालयाने हा खटला निकाली काढत निर्दोष मुक्तता केली आहे.

मिरज शहरामध्ये 2009 साली गणेशोत्सवा दरम्यान शिवसेनेकडून मिरज शहरामध्ये अफजलखान वधाच्या फलक उभारण्यात आला होता. त्यावर लिहिण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकूरानंतर मिरज शहरामध्ये जातीय दंगल भडकली होती.दहा ते पंधरा दिवस मिरज शहर या दंगलीत धगधगत होतं.या दंगलीचे पडसाद सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते.पंधरा दिवस मिरज-सांगली शहरांमध्ये कडक संचारबंदी लागू होती. या दंगली प्रकरणी सांगली महापालिकेचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या 106 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दंगलीचा खटला सुरू होत, दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता.त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने खटला बरखास्त करून या दंगली प्रकरणी 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे,अशी माहिती बचाव पक्षाच्या वकील बिलकीस बुजरूक यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com