संभाजी भिडे हाजीर हो! ८ दिवसात हजर राहण्यासाठी पोलिसांकडून नोटीस जारी
सूरज दहाट | अमरावती : संभाजी भिडे यांच्यावर महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून लोकांमध्ये असंतोष पसरविण्याचा आरोप आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे व आयोजकांना नोटीस जारी केली आहे. यानुसार संभाजी भिडे यांना ८ दिवसात अमरावती पोलिसाकडे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यादरम्यान त्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून व लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाजघटकांमध्ये वाद वाढविण्याचे भाष्य केले तथा महापुरुषांची बदनामी केली. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे, निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
यानुसार संभाजी भिडे यांना ८ दिवसात अमरावती पोलिसाकडे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाजी भिडे यांना दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे ८ दिवसात संभाजी भिडे अमरावती पोलिसाकडे हजर राहतात का? याकडे लक्ष सर्वांचेच लागलं आहे. तर याच संदर्भात राज्यात ज्या ठिकाणी भिडेंवर गुन्हे दाखल झाले त्या ठिकाणचे गुन्हे अमरावतीत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहात संभाजी भिडेंप्रकरणी निवेदन दिले. संभाजी भिडे यांनी अमरावतीतील भाषणात आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले. त्यावरून त्यांनी काही कमेंट केल्या आहेत. याप्रकरणी अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानुसार पोलिसांनी भिडेंना नोटीस पाठविली असून त्यांनी ती स्वीकारली आहे. याप्रमाणे चौकशी होईल, देवेंद्र फडणवीसांनी म्हंटले आहे. यावेळी फडणवीसांनी भिडे गुरूजी म्हंटल्याने विरोधकांनी एकच गदारोळ केला होता.