लालपरीचे सेवेकरी चिंतेत; कर्मचाऱ्यांचा  पगार कधी होणार?

लालपरीचे सेवेकरी चिंतेत; कर्मचाऱ्यांचा पगार कधी होणार?

Published by :
Published on

महाराष्ट्र अनलॉक होतोय ,ग्रामीण भागाचा श्वास म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर होत असताना ९० हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचारी मात्र चिंतेत आहेत.याच कारण म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत.गेले दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार हा उशिरा झाला होता. मात्र आता या महिन्याची ११ तारीख उलटली तरी त्यांचा खात्यावर अजून पगार आलेला नाही.यामुळे आता 'महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना' ही मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटना मुंबईतील औद्योगिक न्यायालयात दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.

सध्या एसटी सेवा नेहमीप्रमाणे धावत नसून १०ऑगस्टच्या आकडेवारीनुसार १० हजार २२४ एसटीच्या फेऱ्यांच्या माध्यमातून २० लाख ५९ हजार प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला. यामधून एसटीला ९ लाख ९७ हजार रुपये एवढे उत्पन्न मिळाले. कोरोना काळ सुरू होण्याच्या आधी एसटीला दररोज सरासरी एक लाख फेऱ्यांच्या माध्यमातून २४ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळायचे, दररोज ६५ लाख प्रवासी प्रवास करायचे.

कोरोना काळात सुरुवातीला एसटी सेवा सर्वसामान्य लोकांकरिता पूर्णपणे बंद होती, त्यामुळे एसटीला मोठा फटका बसला होता. अनेक प्रकारच्या अनुदानांचा परतावा सरकारकडून थकला आहे. या सर्व परिस्थितीमुळे एसटी महामंडळावर कर्जाचा बोझा दिवसेंदिवस वाढत असून आता हा आकडा आता सहा हजार कोटींपेक्षा जास्त झाला आहे.

या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांचा पगार देणे एसटी महामंडळाला दिवसेंदिवस अशक्य होतं आहे. गेल्या वर्षी दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नव्हता, राज्य सरकारने एक हजार कोटींची तात्काळ मदत केल्याने ते प्रकरण मार्गी लागले होते. तेव्हा सध्याच्या परिस्थितीत सरलेल्या कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न एसटी महामंडळापुढे आहे. ९० हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अजून झालेला नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com