सचिन तेंडूलकरला ताडोबातील वाघांची भुरळ

सचिन तेंडूलकरला ताडोबातील वाघांची भुरळ

Published by :
Published on

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर पुन्हा एकदा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा-अंधारीच्या प्रेमात पडला आहे. सलग दोन वर्षांपासून तो ताडोबाला भेट देत आहे. जानेवारी महिन्यात तो चार दिवस सहकुटुंब ताडोबात राहण्यासाठी आला होता. दरम्यान जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने सचिनने आपल्या चाहत्यांसाठी त्याच्या फेसबुक पेजवर ताडोबा-अंधारीतील व्याघ्र सफारीचा खास व्हीडीओ शेअर केला आहे. ४ मिनिट ३५ सेकंदाच्या या व्हिडीओत सचिनच्या चेहऱ्यावर व्याघ्र दर्शन झाल्यानंतर आनंद व्यक्त होताना दिसत आहे. या दरम्यान घेतलेल्या चित्तरंजक अनुभवाचा व्हिडिओ त्याने आपल्या युट्युब चॅनेलवरसुद्धा टाकला आहे.

या व्हिडिओत जंगल सफारी करताना झालेले वाघांचे दर्शन आणि या अनुभवाचे वर्णन करताना सचिन दिसत आहे. या दरम्यान सचिनने बफरमधील अलीझंझा, मदनापूर, बेलारा या तीन तर कोअरमधील कोलारा गेटमधून जात एकूण चार सफारी केल्या. त्याला वाघ, बिबटसह रानगवा, सांबर, चितळाने दर्शन दिले. नवरंगी, सातभाई व स्थलांतरित पक्षीही त्याने पाहिले. या अनुभवाची छोटीशी झलक त्याने आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर टाकली आहे. ३ मार्चला रात्री दहाच्या सुमारास शेअर केला. त्यानंतर काही वेळेतच त्याला ३० हजारांवर लाइक्स मिळाला. ४९९ कॉमेंट्स आणि ६०८ चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअरही केला. सचिनच्या फेसबुक पेजचे २७ दशलक्ष लाइक्स असून जगभरातील ३५ दशलक्ष लोक या पेजला फॉलो करतात.

ताडोबाची ओळख
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वाघ असलेला व्याघ्रप्रकल्प म्हणून ताडोबाची ओळख आहे. आजवर अनेक दिग्गज व्यक्तींनी ताडोबाच्या जंगल सफारीचा अनुभव घेतला आहे. एकदा आलेल्या व्यक्तीला ताडोबाची भुरळ पडते आणि मग तो परत परत ताडोबातील पट्टेदार वाघ आणि घनदाट जंगलाचा अनुभव घ्यायला नक्की येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील याला अपवाद नाहीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com