‘या’ ६ राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी ‘RT-PCR’ चाचणी बंधनकारक
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात दरदिवशी ६० हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, राज्य सरकारनं ६ राज्यांना अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलं आहे. या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केलं आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना त्याआधी ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यात प्रवेश करताना किंवा रेल्वेस्थानकावर आल्यावर रिपोर्ट दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४५ हजार ६५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तर गेल्या चोवीस तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.