जुन्नरमध्ये पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा; दरोडेखोरांच्या गोळीबारात एक जखमी
सचिन चपळगावकर | पुण्यातील जुन्नर तालुक्यात एका पतसंस्थेवर दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी जवळपास अडीच लाखांची रक्कम लंपास केली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात पतसंस्थेतील व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) हे गंभीर जखमी झाले आहेत.पतसंस्थेतील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
कांदळी अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. या दरम्यान दुपारी दीड वाजण्याचा सुमारास व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर व लिपिक अंकिता नेहरकर जेवण करत होते. त्याच दरम्यान पतसंस्थेत हेल्मेट घालेले दोन अज्ञात व्यक्ती आले. त्या दोघांनी व्यवस्थापक भोर यांच्याकडे थेट पैश्यांची मागणी केली. मात्र भोर यांनी नकार दिली. त्यानंतर त्यांनी थेट भोर यांच्यावर गोळीबार केला. अन जवळपास अडीच लाखांची रक्कम घेऊन दोघेही पसार झाले.घटनेची माहिती मिळताच पोलीस व श्वान पथक घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेले व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय -५२) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांच्या पूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.