महागाईची धग वाढली : मुंबईकरांचा टॅक्सी-रिक्षा प्रवास महागला!
पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने वाढीमुळे महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत असतानाच मुंबईकरांचा टॅक्सी-रिक्षाचा प्रवास महागला आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचे किमान भाडे तीन रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे आता अनेक मुंबईकर बेस्ट बसला प्राधान्य देण्याची चिन्हे आहेत. ही भाडेवाढ 1 मार्चपासून लागू होईल.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वर्षभरापूर्वी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यामुळे इतर उद्योग-धंद्यांप्रमाणेच टॅक्सी-रिक्षावाल्यांचेही उत्पन्न बंद झाले होते. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत होती. पण अलीकडे पेट्रोल आणि डिझेलची सातत्याने दरवाढ होऊ लागली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात बसलेला आर्थिक फटका आणि आता वाढत चालल्या इंधनाच्या किमतींमुळे टॅक्सी-रिक्षाच्या भाडेवाढीची शक्यता होतीच.
खटाव समितीच्या शिफारशीनुसार आज मुंबई एमएमआर रिजनमधील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. त्यानुसार 18 रुपयांचे रिक्षाभाडे आता 21 रुपये तर, टॅक्सीचे 22 रुपयांच्या भाड्यासाठी आता 25 रुपये मोजावे लागतील.
यापूर्वी 2015 साली भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर सहा वर्षे भाडेवढ झालेली नव्हती. त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. पेट्रोल, डिझेल, सीनजीचे दरही वाढलेले आहे, असे अनिल परब म्हणाले. चुकीच्या पद्धतीने मीटर रिडींग होत असेल तर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईत रिक्षाची संख्या 2 लाख तर, टँक्सींची संख्या 48 हजार आहे.
बेस्टला फायदा होण्याची शक्यता
या रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा फायदा बेस्ट बसला होण्याची शक्यता आहे. तीन रुपयांची भाडेवाढ, त्यात ठिकठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी, काही वेळेला मीटर फास्ट असल्याचा अनुभव, तर दुसरीकडे बेस्टचे किमान भाडे पाच रुपये, हे सर्व ध्यानी घेता ही भाडेवाढ बेस्टच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.