पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे रुप, आराखड्याला मंजुरी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे मूळ स्वरूप देण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मदतीने आराखडा तयार केला आहे. हा आराखडा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नुकताच मंजूर केला असून तो अंतिम मंजुरीसाठी शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे या आठवड्यात पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितिचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
येत्या पाच वर्षांत आराखड्यानुसार मंदिरातील विविध कामांसाठी सुमारे 61 कोटी 50 लाखांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी राज्य शासन आणि देणगीदारांनी मदत करावी अशी मागणी मंदिर समितीने केली आहे. यामध्ये संत नामदेव पायरी, दर्शन रांग व देवाचा गाभारा यामध्ये बदल केले जाणार आहेत.
पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 11 व्या शतकातील असल्याचे अभ्यासक सांगतात. आता पुन्हा मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे मूळ रूप देण्यासाठी आराखडा बनवला आहे. पुरातत्व विभागाने दोन वर्षे अभ्यास करून मूळ रुप देण्याचा आराखडा तयार केला आहे.
यासाठी 61 कोटी 50 लाखांचा आराखडा मंदिर समितीकडे दिला होता. त्यावर मंदिर समितीने मंजुरी दिली आहे.