रिफायनरी आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित; 3 दिवसांत सर्वेक्षण थांबले नाही तर..., ग्रामस्थांचा इशारा
निसार शेख | रत्नागिरी : रिफायनरी विरोधात बारसूमध्ये सुरु असलेले आंदोलन आता तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. स्थानिक नेत्यांनी याची घोषणा केली आहे. याचबरोबर जर तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन पुकारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बारसूमध्ये कोणावरही लाठीचार्ज केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही स्थानिक तर काही बाहेरून आलेले लोक आहेत, असेही ते म्हणाले. या दरम्यान बारमध्ये आंदोलकांशी बोलण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आले होते. त्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. परंतू, जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस काही घोषणा होत नसल्याने आंदोलक त्यांच्यासमोरून निघून गेले. राजापूरमध्ये देखील दोन तास संवाद साधला होता.
प्रशासन तुमच्या सोबत आहे, समस्यांवर मार्ग निघू शकतील. प्रतिनिधींचे नावे द्या, आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधू, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलणे थांबविले. माती परीक्षण तीन दिवसांत थांबवा. तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन सुरु होईल. तीन दिवसांत पुन्हा चर्चा झाली नाही तर पुन्हा आंदोलन करणार, असा इशारा स्थानिक नेते काशिनाथ गोर्ल यांनी दिला.
दरम्यान, कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन तापले असून आंदोलक-पोलिस आज आमने-सामने आले होते. यादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यामध्ये काही स्थानिक जखमी झाल्याचेही समोर आले आहे.