Indian Currency : नोटांवरील गांधीजींचा फोटो बदलणार की नाही; RBI ने सांगितले...
भारतीय चलनावर म्हणजेच रुपयावर महात्मा गांधींचा फोटो आहे. दरम्यान वस्तू व सेवा कर, नोटबंदी आदींसारख्या निर्णयांनंतर आता मोदी सरकार नोटांवरील फोटोमध्ये मोठा फेरबदल करण्याची शक्यता होती. या नोटांवर (Notes) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या फोटोसोबत आता रविंद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) आणि एपीजे कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांचे फोटो दिसणार होते. मात्र आता भारतीय चलनावरील महात्मा गांधी यांची प्रतिमा बदलण्याचा कुठलाही विचार नसल्याचं रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पष्ट केलं आहे.
रिझर्व्ह बँकेनं आपल्या निवेदनात म्हटलं की, सध्याच्या चलनात आणि बँकेच्या नोटांमध्ये कुठलाही बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या आरबीआयकडे (RBI) आलेला नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय चलनावर रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे छायाचित्र वापरण्याचा विचार करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
पहिल्यांदा 1969 मध्ये छापले बापूंचे छायाचित्र
1969 मध्ये रिझर्व्ह बँकेने 100 रुपयांच्या नोटेवर पहिल्यांदा महात्मा गांधींचा फोटो छापला होता. हे गांधींचे जन्मशताब्दी वर्ष होते आणि आठवण म्हणून नोटेवर बापूंचे छायाचित्र छापले. नोटेवरील चित्राच्या मागे सेवाग्राम आश्रमाचे चित्रही होते. 1987 मध्ये जारी करण्यात आलेल्या नोटांवर पहिल्यांदा गांधींच्या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो छापण्यात आला होता. या फोटोसह 500 रुपयांची पहिली नोट ऑक्टोबर 1987 मध्ये आली होती. यानंतर गांधीजींचा हा फोटो इतर नोटांवरही वापरला जाऊ लागला.
दरम्यान, यापूर्वी डोंबिवलीतील संकल्प प्रतिष्ठाननं सन 2010 साली आरबीआय आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पत्रव्यवहार करत अशीच मागणी केली होती. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील फोटो भारतीय चलनवर यावा अशी मागणी केली होती.