वाझे प्रकरणावरून राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, आमदार रवी राणा यांचे भाकीत
अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यावरून भाजपा आक्रमक झाली असून त्यांनी महाविकास आघाडी, विशेषत: शिवसेनेला लक्ष्य केले आहे. याबाबत बडनेराचे आमदार रवी राणा यांनी वझे यांच्याबाबतीत धोक्याचा इशारा देतानाच येत्या काही दिवसांत राज्यात राजकीय भूकंप होऊ शकतो, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाजवळ उभ्या केलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. ही गाडी ठाण्यात राहणाऱ्या मनसुख हिरेन यांची होती. पण त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याचासंदर्भ देत रवी राणा यांनी सांगितले की, मनसुख हिरेनप्रमाणेच सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुऴे त्यांना संरक्षण दिले पाहिजे
स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकरीत आहे. तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे आहे. तथापि, एनआयए चौकशीमुळे 'मातोश्री' अडचणीत आली असून वाझे यांच्या जीविताला धोका आहे. म्हणून मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे, असे सांगतानाच, आगामी काळात राज्यामध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.