रश्मी शुक्लांना फोन टॅपिंग प्रकरणात कोर्टाकडून मोठा दिलासा!
मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावरील दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे गुन्हे शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले होते. परंतु, आता रश्मी शुक्लांना दिलासा देण्यात आला आहे.
नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्याचे फोन टॅपिंग केले होते. यानंतर फेब्रुवारी महिन्यात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई आणि पुण्यातील पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
परंतु, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे बेकायदा फोन टॅपिंग केल्याच्या आरोपाप्रकरणी फौजदारी कारवाईसाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारची परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे आपल्याला या प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात यावे, अशी मागणी रश्मी शुक्ला यांनी केली होती.
दरम्यान, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. सत्तातंरानंतर त्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. तर, दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रश्मी शुक्ला यांची भेट झाल्याची माहिती मिळाली होती. यामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या.