रश्मी शुक्लांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती; पहिल्याच महिला डिजीपी
मुंबई : मविआमधील काही राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागानं याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत.
राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी त्यांच्या नावावर डिसेंबरमध्येच शिक्कामोर्तब केले होते. आज अखेर याबाबत राज्य शासनाच्या गृह विभागानं आदेश काढले आहेत. राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत.
1988 च्या बॅचच्या आयपीएस असलेल्या रश्मी शुक्ला यांची कारकीर्द मोठ्या वादात सापडली होती. नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणाची शुक्ला यांच्यावर आरोप होते. याप्रकरणी शुक्ला यांच्यावर पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुढे दोन्ही गुन्हे कोर्टाने रद्द केले. हे खटले रद्द केल्यानंतर तीन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.