मोदींंची नक्कल करण्यावरुन विधानसभेत गदारोळ; कारवाई करा नाहीतर माफी मागावी, विरोधकांची मागणी
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021) आजपासून सुरु होत आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची दुपारी बैठक आहे. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभेत राज्यातील वीज कनेक्शन कापणीसंदर्भातील धोरणावर चर्चा सुरू असताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका विधानाचा संदर्भ दिला. "पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ५० लाख जमा करणार असं म्हटलं होतं, ते केले नाहीत", असं राऊत म्हणाले. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेत राऊतांना आव्हानच दिलं.
मी जाहीर आव्हान देतो… – फडणवीस
"मी आव्हान देतो की नितीन राऊतांनी पंतप्रधानांनी असं म्हटल्याचं वाक्य आणून दाखवावं नाहीतर देशाची माफी मागावी. या सभागृहात नसणाऱ्यांविषयी बोलायचं नसतं कारण ते उत्तर देण्यासाठी इथे नसतात असा नियम आहे. वाट्टेल ते बोलायचं हे चालू देणार नाही. आम्ही तुमच्या नेत्याबद्दल बोलू का? हे कामकाजातून काढा", असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावर बोलताना नितीन राऊतांनी २०१४ च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा केल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं. यावर देखील आक्षेप घेत देवेंद्र फडणवीसांनी मोदी असं म्हटलेच नसल्याचा दावा केला.