सांगलीच्या लेकीनं युरोपातील सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा
संजय देसाई | सांगली : माउंट एल्ब्रस या युरोप खंडातील सर्वात उंच असलेल्या पर्वतावर स्वातंत्र्यदिनी उरूण इस्लामपूरच्या राजश्री जाधव-पाटील यांनी राष्ट्रध्वज फडकवला आहे. देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनी ही मोहीम त्यांनी ४ मे रोजी मणिपूर येथील सामूहिक अत्याचारास बळी पडलेल्या महिलांना समर्पित केली आहे. मणिपूरमध्ये स्त्रियांवर झालेला अत्याचाराचा त्यांनी तीव्र निषेध केला. तसेच गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. भारतात स्त्रियांच्या वाढत्या असुरक्षितता आणि अन्याय बद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
मागील वर्षी म्हणजे भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी त्यांनी आफ्रिका खंडातील माउंट किलीमांजारो या सर्वोच्च शिखरावर आपला राष्ट्रध्वज फडकवला होता. जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च शिखर सर करण्याचा राजश्री यांचा संकल्प असून त्यांनी गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील सह्याद्री मधील गडकिल्ले तसेच हिमाचल प्रदेश, लडाख सारख्या हिमालयीन मोहिमांमध्ये सातत्याने सहभाग घेतला आहे.