मनसे प्रमुख राज ठाकरे मार्चमध्ये अयोध्येत घेणार रामलल्लाचे दर्शन
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्च महिन्यात अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. अयोध्येला जाण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र 9 मार्चनंतर राज ठाकरे राज्याचा दौरा करणार आहे. त्यामुळे त्याआधी ते अयोध्येला जातील.
'मराठी माणूस' हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून मनसेने सुरुवातीला आंदोलने केली होती. अलीकडेच त्यांनी पक्षाचा झेंडा बदलून 'हिंदुत्वा'च्या मुद्द्यावर भर दिला. आता ते अयोध्याचा दौरा करणार आहेत. 1 ते 9 मार्चच्या दरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाऊन रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. मुंबईमध्ये आज (शुक्रवारी) झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
कांदिवली येथे 2 डिसेंबर 2018 रोजी राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर गेले होते. आता ते अयोध्यादौरा करणार आहेत. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधत शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या वर्षी 7 मार्चला अयोध्येला गेले होते. त्यानिमित्ताने शिवसेनेने अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन केले होते. त्याआधी 2018 आणि 2019 असे दोन वेळा अयोध्येला गेले होते. तर आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा जाहीर करण्यात आला आहे.