Babasaheb Purandare Passed Away | राज ठाकरेंनी घेतले बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांची निधनाची बातमी समजताच सकाळी 6 वाजता राज ठाकरे मुंबईतील निवासस्थानाहून रवाना झाले होते. पुढच्या 45 मिनिटांत राज ठाकरे पुण्यात दाखल झाले.
इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ऋणानुबंध सर्वांनाच माहित आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांच्या चरित्राचे लिखान केले होते. जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग त्यांनी सुरू केले. बाबासाहेबांच्या कार्यामुळे राज ठाकरे प्रेरित होते. एका समारंभात राज यांनी बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं होतं. राज यांच्या या कृतीचं खुप कौतुक झालं होतं.
बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती.
राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबपुष्प व पगडी देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्यानंतर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. राज ठाकरेंच्या या कृतीमुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले सारेच भारावून गेले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. 'जाणता राजा' या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. 'सावित्री', 'जाळत्या ठिणग्या', 'मुजऱ्याचे मानकरी', 'राजा शिवछत्रपती', 'महाराज', 'शेलारखिंड', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'शनवारवाड्यातील शमादान', 'शिलंगणाचं सोनं', 'पुरंदरच्या बुरुजावरून', 'कलावंतिणीचा सज्जा', 'महाराजांची राजचिन्हे', 'पुरंदऱ्यांची नौबत' आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.