लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरे यांचं ट्विट, म्हणाले...

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरे यांचं ट्विट, म्हणाले...

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. टिळकांच्याबद्दल बोलताना त्यांनी, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे... ' ही भूमिका मांडली होती हे प्रत्येकाला आठवतं आणि राजकीय व्यवस्थेला तर हे इतकंच सांगणं अधिकच सोयीचं होतं कारण टिळकांनी ज्या स्वराज्याची घोषणा केली होती ते मिळालं आता अजून काय हवं? आणि ही धारणा दिवसेंदिवस पक्की होत चालली आहे. त्यात स्वराज्याची व्याख्या म्हणजे स्वतःच राज्य स्थापित करणं आणि त्यासाठी वाट्टेल ते करणं अशी झाली आहे. असो, पण लोकमान्य टिळकांना जसं 'स्वराज्य' अभिप्रेत होतं तसं 'सुराज्य' अभिप्रेत होतं.

टिळकच कशाला ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्याच्यासाठी आयुष्य वेचलं, त्या प्रत्येकाला स्वराज्य हवं होतं देशाला पारतंत्र्यातून बाहेर काढायचं होतं पण म्हणून तितकंच अपेक्षित नव्हतं. त्यापलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांसाठी लोकांचं चालवलेलं राज्य आणायचं होतं. कोणालाच समाजात जातपात यावरून विभागलेला समाज नको होता.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, टिळकांच्या काळात आणि पुढे सुद्धा जहाल आणि मवाळ असा वाद होता पण तो वाद एकमेकांच्या छाताडावर बसून समूळ नष्टच करतो अशा क्रूर टोकापर्यंत कधीच गेला नाही. आज एका बाजूला राजकारण हे एकमेकांना संपवून टाकेन या टोकापर्यंत जात आहे आणि त्यातून तेच विष समाजात जातीजातीत पसरवलं जात आहे. सद्यस्थितीत 'सत्तेसाठी वाट्टेल ते' च्या काळात संपूर्ण हिंदुस्थानाचा विचार करणाऱ्या लोकमान्यांना फक्त पोकळ आदरांजली वाहण्याच्या ऐवजी, महाराष्ट्रातील जनतेने आपापसातील जातीभेद गाडून, ते पेरणाऱ्यांना पण गाडून पुन्हा एकदा प्रतिभा आणि संस्कृती यांचं अद्वितीय संगम असलेला महाराष्ट्र करण्याची शपथ घेणे हीच टिळकांना आदरांजली ठरेल. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन. असे राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com