bhonga vs Hanuman Chalisa : राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातल्या विविध ठिकाणी मनसैनिकांनी (mns) मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी सकाळच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. राज ठाकरेंचा तुमच्यासाठी एकच निरोप आहे. ते आज संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेत ते फक्त एकटेच संवाद साधतील. राज ठाकरे कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देणार नाहीत, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने काल राज ठाकरेंसह पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवरही कारवाईला सुरूवात केली. पण तरी मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे पोलीस रात्रीपासूनच सतर्क आहेत. आज सकाळी राज्यातल्या विविध भागांमध्ये पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली आहे.
शिवाय आज सकाळी मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली येथील जामा मशिदी जवळ हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये पोहचले असता. रबाले पोलिसांनी निलेश बाणखेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तसंच रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी डी ढाकणे यांनी हिंदू आणि मुस्लिम बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून सर्व मस्जिदींवर चोख पोलिस बंदोबस्त केले असल्याचं पोलिसांनी सांगितलं.