मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; NDRF तैनात, मदतीसाठी हेलिकॉप्टरला पाचारण
महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada), विदर्भ (Vidarbha) काही जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळदार पावसामुळे नद्या- नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही ठिकाणी पूरस्थितीमुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाकडून तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या असून बचावकार्य सुरू झालं आहे.
सोमवारी दुपारपासून मंगळवारी पहाटेपर्यंत झालेल्या धुवाधार पावसाने बीड जिल्ह्यात अक्षरश: हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव तालुक्यात परिस्थिती गंभीर झाली आहे. अंबाजोगाई, केज तालुक्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत, बंधारे फुटले आहेत. पुले वाहून गेली आहेत. धरणे खचाखच भरली आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहेत. ग्रामस्थांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ बोटसहित तैनात करण्यात आले आहेत. तर दुपारपर्यंत अंबाजोगाई हेलिकॉप्टरला पाचारण केले जाणार आहे.
केज तालुक्यामध्ये बंधारे फुटले आहेत, शेती वाहून गेली आहे, भाटुंबा, कुंबेफळ, पिसाटी, मांजरसुंबा, अंबाजोगाई रस्ते बंद करण्यात आले आहेत. अंबाजोगाई-कळंब रस्ताही बंद करण्यात आला. सावळेश्वराचा पुल पाण्याखाली आहे. बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यात परिस्थिती भयंकर झाली आहे. आपेगाव येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सध्या बोटीचा उपयोग केला जात असला तरी हेलिकॉप्टरलाही पाचारण केले जाणार असल्याची शक्यता आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी तशा सूचना दिल्या आहेत. संपूर्ण प्रशासन लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेशही दिले आहेत.