मुंबई : मान्सूनची वाट पाहता पाहता बऱ्याच राज्यात मान्सूनला सुरूवात झाली आहे. जून महिन्याच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु, आता येत्या 48 तासात मान्सूनचा जोर वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, पावसाअभावी अनेक शहरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे.
मुंबईसह कोकण, गोव्यात 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची हजेरी लागणार आहे. यावेळी किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. यामुळे नागरिकांना सर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मुंबईत आज आकाश ढगाळ राहणार असून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. मात्र, उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
दरम्यान, समाधानकारक पाऊस होऊपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषि विभागाकडून वारंवार करण्यात येत आहे. गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के (20.30 लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.