पुणे, नागपुरात शाळांची घंटा वाजणार, काय असणार निर्बंध जाणून घ्या…
आजपासून पुणे- नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा सुरू होणार असून यामध्ये पहिली ते सातवीचे वर्ग परत भरणार आहेत. तसेच शाळा सुरु करण्यासाठी पालिका आयुक्तांनी देखील मान्यता दिली आहे. कोरोनानंतर ओमायक्रॉनचा धोका वाढल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र आता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा परत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेत .
नागपूरमधील शाळा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता गुरुवारी 16 डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू करण्यासंदर्भात नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता. 15) आदेश जारी केले आहेत. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या बाळगून शाळा सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी तशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे.
काय आहेत नागपूर मनपा शाळेतील निर्बंध
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असलेल्या मनपाच्या 116 शाळांसह 1053 खासगी शाळा अशा एकूण 1069 शाळा गुरूवारी (ता. 16) सुरू होतील. नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये असलेल्या 1069 प्राथमिक शाळांमध्ये एकूण 2 लाख 49 हजार 715 विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये मनपाच्या शाळेमध्ये 9319 विद्यार्थी तर अन्य खासगी शाळांमध्ये 2 लाख 40 हजार 396 एवढी विद्यार्थी संख्या आहे.