चंद्रशेखर भांगे, पुणे
पुणे नगर महामार्गावर पीएमपीएमएल बस मधून प्रवाशांची वाहतूक करताना बस चालक हात सोडून, मोबाईलवर बोलून नागरिकांच्या जीवाची पर्वा न करताना बस चालवत असल्याचे समोर आले आहे. शिक्रापूर येथील पुणे नगर महामार्गावरून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ हे पीएमपीएलच्या एम एच १२ ३८१० या बस क्रमानक १६१ मधून प्रवास करत असताना बस चालक वारंवार बसच्या बाहेर तोंड काढून थुंकुन, सारखे हात सोडून तब्बल सात मिनटे मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून आले.
दरम्यान नवनाथ भुजबळ यांनी या घटनेचे चित्रीकरण देखील केले. सदर प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता देखील नवनाथ भुजबळ यांनी वर्तवली तसेच सदर बाब अतिशय गंभीर असल्याने या बसवरील चालकावर कारवाई करावी तसेच अशा प्रकारामुळे कोणती दुर्घटना घडणार नाही. यासाठी वाहकांमध्ये प्रबोधन करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ यांनी केली आहे.