सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीत रंगला रक्षाबंधन सोहळा
वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या वारांगना महिलांना आपली बहीण मानत पोलिसांनी त्यांच्यासमवेत रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला. यामुळे वेश्यावतीतील अंधाऱ्या खोलीत आपलं आयुष्य जगणाऱ्या या वारांगना महिलांचे भाऊ म्हणून पोलीस धावून आले.
सांगलीच्या या सुंदरनगर वेश्या वस्तीत आपल्या कुटुंबापासून कोसो दूर असणाऱ्या आणि इच्छा नसता या व्यवसायात गुंतलेल्या वारांगना महिलांना सुद्धा रक्षाबंधनासाठी आपल्या भावाकडे जायची ओढ आहे. मात्र काही कौटुंबिक कारणामुळे या महिला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा महिलांना याच ठिकाणी रक्षाबंधनाचा योग आणण्यासाठी वारांगना महिलांच्या नेत्या स्व. अमिराबी शेख आणि पत्रकार दीपक चव्हाण, जमीर कुरणे यांनी पुढाकार घेत वेश्यावस्तीतच रंक्षाबंधन सुरू केले.
यामुळे या सुंदरनगरमधील वारांगना महिलांना रक्षाबंधन साजरे करता आले. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधत पोलीस बांधवाना आपले भाऊ मनात या पवित्र सणाचा आनंद घेतला. यामुळे वारांगना महिलाही भारावून गेल्या.