मावळमध्ये गोळीबार करणारे आता सांगतायत बळाचा वापर करू नका, दरेकरांची पवारांवर टीका
लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांविरोधी आंदोलनाला काल, प्रजासत्ताक दिनी हिंसाचाराचे गालबोट लागले. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे जवळपास दोन महिने आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काल त्यांनी ट्रॅक्टर परेड काढली. पण त्याला हिंसक वळण लागले. त्यानंतर सायंकाळी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी बळाचा वापर न करण्याचा सल्ला मोदी सरकारला दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, 2011 साली मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करून 3 शेतकऱ्यांना ठार करणारे, आज केंद्र सरकारला सांगतायत की बळाचा वापर करू नका! कुठल्या तोंडाने तुम्ही हे सांगत आहात? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
दिल्लीत बळाचा वापर झाला असता, तर तिथे पोलीस 300 जखमी झालेच नसते, असे सांगून दरेकर म्हणाले, शेतकरी आंदोलनाबद्दल प्रेम दाखवणाऱ्यांचे पुतना मावशीचे प्रेम आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर हिंसाचार घडवायचा होता. यामागे कोण आहे, ते समोर येईलच.
फडणवीसांचे मौन
प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांबरोबरच भाजपाच्या अनेक नेत्यांचीही प्रतिक्रिया आली आहे. मात्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजून या हिंसाचाराबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.