जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! एक तक्रार अन् लोकनियुक्त सरपंचाचे पदच केले रद्द
संजय देसाई | सांगली : मिरज तालुक्यातील जानराववाडी येथील लोकनियुक्त सरपंच व दुय्यम बाजार समितीचे माजी सभापती भारत हिम्मत कुंडले यांचे पद रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सुमारे पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करत द्राक्ष बाग केली होते. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कुंडले यांना दणका देत थेट सरपंच पद रद्द केले आहे. त्यामुळे मिरज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जानराववाडी ग्रामपंचायत निवडणूक 18 डिसेंबर २०२२ रोजी झाली होती. त्यामध्ये भारत कुंडले हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून 64 बेघरांना देण्यात आलेल्या जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याची तक्रार संभाजी साळुंखे, सुनील बिसुरे, श्रेयसराव कुंडले यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली होती. त्यानुसार भारत कुंडले यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून द्राक्ष बागेसह इतर पिके लावल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी भारत कुंडले यांचे सरपंच पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. भारत कुंडले यांचे सरपंच पद रद्द झाल्याने अनेक शासकीय जगावर अतिक्रमण केलेल्या सदस्यांचे पद रद्द होण्याची टांगती तलवार राहिली आहे.