पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखो रुपये किंमतीच्या १२ मोटारसायकल जप्त
विशाल ठाकूर | धुळे : धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. दिवसागणिक वाढत असलेल्या या प्रकारांनी या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासना समोर उभे ठाकलं होतं.
धुळे शहर, शिरपूर, थाळनेर, अंमळनेर, शहादा, जळगाव, मालेगाव, नाशिक यांसह विविध ठिकाणाहून समोर येत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना गांभीर्याने घेत या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी शिंदखेडा तालुक्यातून सागर मालचे, विजय मालचे, आनंद मोरे, इकबाल हैदर पिंजारी व अमर पावरा याना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडून जवळपास चार लाख रुपये किमतीच्या बारा मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आल्या असून पुढील तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या या वाहन चोरीच्या घटनांना गांभीर्याने घेत नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे.