सभेला गर्दी न जमल्याने पंतप्रधानांचा दौरा रद्द; काँग्रेसचे भाजपाला प्रत्युत्तर

सभेला गर्दी न जमल्याने पंतप्रधानांचा दौरा रद्द; काँग्रेसचे भाजपाला प्रत्युत्तर

Published by :
Published on

पंतप्रधान मोदींची पंजाबच्या फिरोजपूरमधील रॅली रद्द झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत चूक झाल्याची माहिती मिळाली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता.  अशी माहिती मंत्रालयाने एका निवेदनात दिली. मुसळधार पावसामुळे मोदींची रॅली रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यासोबतच, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक घडून आली. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे.

यासर्व प्रकारावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाब सरकारला यावरुन जाब विचारल्यानंतर त्याला काँग्रेसने उत्तर दिलं आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यामागे निदर्शकांचे कारण नसून मोदींच्या सभेतील मोकळ्या खुर्च्या आहेत असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे. सुरजेवाला म्हणाले की, "पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 10 हजार सुरक्षाकर्मी तैनात होते. या दौऱ्यासाठी सर्व व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली होती. पण पंतप्रधानांनी त्यांच्या दौऱ्यातील मार्गामध्ये बदल केला. पंतप्रधानांचा ताफा अडवला ते निदर्शक किसान मजदूर संघर्ष कमिटीचे होते. या संघटनेने कृषी कायद्यावरुन केंद्र सरकारसोबत दोनवेळा चर्चा केली होती."

यासोबतच ते म्हणाले की, पंतप्रधानांची ही रॅली रद्द करण्यामागे हे निदर्शकांचं कारण नव्हते तर त्यांच्या सभेसाठी गर्दी न जमणे, खुर्च्या रिकाम्या असणे हे आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे"किसान मजदूर संघर्ष कमिटी आणि शेतकऱ्यांनी मोदींच्या विरोधात आंदोलन का केलं? अजय मिश्रा टेनी यांना मंत्रिपदावरुन दूर करावं, आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे, आंदोलनात मृत पावलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी, एमएसपी वर लवकरच निर्णय घ्यावा या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. पण मोदी सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आहे."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com