...म्हणून कारवाई करताना मी लाथ मारली; 'त्या' व्हिडीओवर महापालिका अधिकाऱ्यांच स्पष्टीकरण
अमोल धर्माधिकारी | पुणे : पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांनी थेट सगळे स्टॉल लाथेने उडवून लावले होते. या प्रकाराचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कृतीवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही संताप व्यक्त केला होता. अखेर यावर अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
फर्ग्युसन रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त गुंडासारखे वागले होते. अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी सगळे स्टॉल लाथेने उडवून लावले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकाराची महापालिका आयुक्तांकडेही तक्रार करण्यात आली आहे. तर, सुप्रिया सुळेंनीही ट्विटरद्वारे माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर माधव जगताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले माधव जगताप?
शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी या सगळ्या कारवाया करत आहोत. मात्र त्या दिवशी अतिक्रमण काढताना मला आणि माझ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ होत होती. माझ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली गेली. आणि म्हणून आम्ही ते पाऊल उचललं. त्यावर कोणी बोलत नाही. हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात असल्याचे माधव जगताप यांनी म्हंटले आहे. व्हिडीओ पुर्ण समजून घ्या, असेही आवाहन त्यांनी केले आहे.